केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जात आहेत. आता ई-श्रम कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ तर मिळणार आहेच पण सर्व असंघटीत कामगारांचा डाटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांच्या सुविधांसाठी ही योजना राबवली जात आहे.
नोंदणीनंतर कामगारांना अपघात विम्याची सुविधा प्राप्त होईल. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरता अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये तर कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच लाभरणार आहे.
त्यातच भविष्यात असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार आहेत. 2020 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा झाली होती तर प्रत्यक्ष सुरवात ही 26 ऑगस्ट 2021 पासून करण्यात आली आहे.
यासाठी कोण पात्र असणार?
- ई-श्रम पोर्टलवर शेतकरी नोंदणी करू शकणार की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या ठिकाणी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करु शकतात. साधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही. केवळ कामगारांना याचा लाभ मिळावा हाच उद्देश सरकारचा आहे.
- असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. 16 ते 59 या वयोगटातील कोणताही असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर ज्याच्याकडे आधार कार्डशी जोडलेला नंबर नसेल तर अशांना नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येते.
नोंदणी करण्याचे दोन पर्याय
- ऑनलाईन नोंदणीसाठी कामगार ई-श्रम संकेत स्थळांचा वापर करू शकतात. तसेच सेतू सुविधा केंद्र, राज्यसेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी नोंदणी करता करता येणार आहे.
- नोंदणीनंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना एक युनिर्व्हसल 12 अंकी अकाऊंट नंबर आणि एक ई-श्रम कार्ड दिले जाते. युएएन देशभरात स्विकारार्ह असते. सामाजिक सुरक्षेसाठी कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासत नाही.
असंघटित कामगार कोण आहेत? :
- लहान आणि सीमांत शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, बांधकाम कामगार, लेबर कामगार, सुतार, मीठ कामगार, वीटभट्ट्या कामगार, खाणी कामगार, घरगुती कामगार, न्हावी कारागीर, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, रिक्शा खेचणारे, ऑटो चालक, रेशीमकाम कामगार, गृहिणी.
ई-श्रम कार्डसाठी अपात्र कोण असणार? :
- संघटित क्षेत्रात गुंतलेली कोणतीही व्यक्ती ई-श्रम कार्ड साठी पात्र नाही.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.