Header Ads Widget

Responsive Advertisement

श्रावण बाळ योजना

श्रावण बाळ योजना महाराष्ट्र:

महाराष्ट्र राज्यातील निराधार, अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या, देवदासी अशा सर्व दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी, त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच, वृद्ध व्यक्तींकरीता केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना राबविण्यात येतात. त्यापैकी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना म्हणजेच, श्रावण बाळ योजना Shravan Bal Yojana Maharshtra या योजनेविषयी सविस्तर माहिती सदर लेखात पाहणार आहोत. या योजनेस 'श्रावण बाळ निराधार योजना' असेही ओळखले जाते. श्रावण बाळ योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवली जाते.

श्रावण बाळ योजना पात्रता, निकष व अटी:

श्रावण बाळ योजनेसाठीची पात्रता, निकष व अटी खालीलप्रमाणे:

• अर्जदार हा १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्‍यक आहे.

• अर्जदार वय वर्ष ६५ व ६५ वर्षावरील स्त्री व पुरुष

• कुटुंबाचे नांव ग्रामीण किंवा शहरी भागाच्या दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे.

• कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. ५०,०००/- तर इतर सर्व लाभार्थ्यांकरीता रु. २१,०००/- पर्यंत असावे.

• शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली मासिक लाभ घेत असलेली व्यक्‍ती श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

• एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनालासुध्दा राहतील.

श्रावण बाळ योजना आवश्यक कागदपत्रे (श्रावण बाळ योजना डोकमेंट्स):

श्रावण बाळ योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे विहित नमुन्यात दिलेल्या अर्जासोबत जोडावी लागतात. Shravan Bal Yojana Documents.

1. वयाचा दाखला

ग्रामपंचायतीच्या/ नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उताऱ्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इ. पुरावे.

2. उत्पन्नाचा दाखला

तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदाराकडून रु.५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार किंवा दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्‍ती / कुटूंबाचा समावेश असल्याबद्दलचा सांक्षाकित उतारा.

3. रहिवाशी दाखला

ग्रामसेवक तलाठी/मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.

श्रावण बाळ योजना अर्ज मंजूर करण्याची पद्धत:

श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदराने केलेल्या अर्जाची मंजुरीची प्रक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासननिर्णयात दिलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे:

• श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असेलेल्या अर्जदाराने, विहित नमुन्यातील दोन अर्जाच्या प्रती आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तलाठयाकडे करावा.

• तलाठ्यामार्फत प्राप्त अर्जाची तपासणी करून, अर्जासोबत जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करतील आणि सविस्तर नोंद नोंदवहीमध्ये घेऊन, अर्जदाराला अर्जाची पोचपावती देतील व प्राप्त अर्ज संबंधित तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवतील.

• संबंधित तहसीलदार/ नायब तहसीलदार यांचेकडे प्राप्त झालेला अर्जाची नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेतील.

• तहसीलदार/ नायब तहसीलदार सदर अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पडताळणी करून अर्ज संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीसमोर निर्णयासाठी ठेवतील.

• प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी समितीद्वारे केल्यानंतर लाभार्थ्याची निवड केली जाईल.

• अर्ज मंजूर किंवा नामंजूर असल्याचे लाभार्थ्यांना कळवावे आणि ज्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत त्यांनाही कारणांसह कळविणे बंधनकारक आहे.

श्रावण बाळ योजना यादी Shravan bal yojana beneficiary list:

श्रावण बाळ योजनेअंतर्गत निवड केलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार करुन अशा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिका प्रभाग कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात याव्यात असे शासनाचे निर्देश आहेत.

जिल्हयातील सर्व योजनांच्या लाभार्थी याद्या संगणकीकृत करुन ठेवाव्यात. लाभार्थ्यांच्या याद्या लावणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सक्तीचे आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांच्या याद्या वेबसाईटवर टाकून त्या वेळोवेळी अद्ययावत करावयाच्या असतात. (श्रावण बाळ योजना लिस्ट 2024 महाराष्ट्र ).